छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरासाठी नव्याने टाकण्यात आलेल्या मुख्य २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून अखेर मंगळवार (दि. १६) पासून जलकुंभांमध्ये वाढीव ७ एमएलडी पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे. येत्या आठवडाभरात ही आवक १०० एमएलडीपर्यंत पोहोचणार असून, पाणीपुरवठा अधिक सुरळीत करण्यासाठी बुधवार (दि. १७) पासून १५०० मिमी व्यासाच्या पुरवठा जलवाहिनीतूनही सुरू केला जाणार आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेतून पहिल्या टप्प्यात दोनशे एमएलडी पाणी घेण्याचा निर्णय झाला. गुढीपाडव्याला जायकवाडी धरणातून सायफनपद्धतीने पाणी उपसा करून जॅकवेलमध्ये पाणी आणण्यात आले. त्यानंतर
दोन दिवसांनी मुख्य जलवाहिनीत पाणी घेण्यात आले. त्यासाठी जॅकवेलवर ३७०० अश्वशक्तीचे दोन पंप बसविण्यात आले. या पंपाद्वारे जलवाहिनीतून पाणी घेऊन स्कोअर व्हॉल्व्हद्वारे पाणी सोडून दिले.
उन्हाळ्यात दिवसेंदिवस जायकवाडी धरणाची पाणी पातळी घटत असल्याने सायफन पद्धतीने पाणी उपसा करण्यास अडथळा निर्माण झाला. हा अडथळा पार करण्यासाठी २० अश्वशक्तीचे पाच सबमर्सिबल पंप बसवून पाणी सायफनच्या पाईपलाईनजवळ आणण्यात आले. पाण्याचा दाब निर्माण करण्यास व्हॅक्यूम पंपही बसविण्यात आल्याने नव्या योजनेत पाण्याची आवक सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने जलवाहिनीची स्वच्छता करून नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले. त्यानंतर शुद्धीकरण केंद्राची
चाचणी घेण्यात आली. नक्षत्रवाडीच्या डोंगरावर उभारण्यात आलेले दोन एसबीआरमध्ये पाणी घेतल्या गेले. पाणी पुरवठा सुरू करण्यापूर्वी पाणी घेताना आलेल्या तांत्रिक अडचणी सोडविण्यात आल्या.
सिडको-हडकोलाही पुरवठा
जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून पाणी आणण्यात येणार आहे. तर नक्षत्रवाडी एमबीआरमधून शहरात पाणी आणण्यासाठी ११००, १५०० आणि २००० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्या टाकल्या आहेत. यातील १५०० च्या जलवाहिनीतून उद्यापासून पाणीपुरवठा सुरू केला जाणार असल्याची माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. या योजनेवरील क्रॉस कनेक्शन जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. यातून सिडको हडको, हर्मूल-जटवाडा, मुकुंदवाडी-चिकलठाणा या भागाला पाणीपुरवठा होणार आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













